You are here: Home » Interview » संगीतकार मिलिंद जोशी यांची महाराष्ट्र टाइम्सने घेतलेली मुलाखत

संगीतकार मिलिंद जोशी यांची महाराष्ट्र टाइम्सने घेतलेली मुलाखत

Milind Joshi DSC_5314-xगीतकार, संगीतकार आणि गायक या तीनही बाजू समर्थपणे पेलणारे मिलिंद जोशी सध्या तरी ‘युद्ध ताऱ्यांचे’ आणि ‘छोट्यांची कमाल सुरांची धमाल’ या रिअॅलिटी शोजचा मेण्टॉर म्हणूनच समोर येताहेत. एकीकडे आल्बम, संगीत कार्यक्रमांच्या माध्यमातून कानसेनांना मंत्रमुग्ध करणारे मिलिंद जोशी चित्रपटांसारख्या प्रभावी माध्यमापसून इतका दूर गेलेत का?…. -- सुचित्रा सुर्वे , महाराष्ट्र टाईम्स

 हल्ली तुम्ही फक्त रिअॅलिटी शोजमध्ये मेण्टॉर म्हणून दिसताय?

प्रत्यक्षात मी संगीतकार म्हणून काम करतोय. बाहेरच्या कामातील ‘आयडेण्टिटी’ हीच माझी खरी ओळख आहे. या ओळखीमुळेच मला अशा कार्यक्रमात मेण्टॉर म्हणून बोलावलं जातं. इट्स माय ऑनर. मी एक यशस्वी संगीतकार, एक सेलिब्रिटी आहे म्हणूनच मी या कार्यक्रमांमध्ये आहे.

केवळ आल्बममधून किंवा संगीत कार्यक्रमांमध्येच समाधानी आहात का? चित्रपटांना संगीत देण्याचा विचार नाही का?

मी संगीत दिलेला ‘सेकंड इनिंग’ सिनेमा लवकरच प्रदशिर्त होईल. आणखीही मराठी चित्रपटांना संगीत देतोय. काही हिंदी सिनेमांच्या संगीत दिग्दर्शनाची संधीही माझ्याकडे चालून आली आहे. सध्या हिंदी चित्रपटांवर फोकस करायला मी सुरुवात केलीय.

तुम्ही संगीत दिलेला पहिला सिनेमा ‘बिनधास्त’. त्यानंतर सिनेमाला संगीत देण्यासाठी इतका गॅप का घेतला?

गॅप पडलाय खरा. पण ‘बिनधास्त’साठी मला ‘झी’चा पुरस्कारही मिळाला होता. मात्र त्यानंतर मी विविध प्रोजेक्टमध्ये बिझी होतो. त्यामुळे चित्रपटांना संगीत देऊ शकलो नाही. मात्र, या दरम्यान रेडिओ, टीव्हीवरील अनेक जाहिरातींच्या जिंगल्स केल्या. नाटकांना, टेलिफिल्म्सना तसंच टीव्ही मालिकांनाही संगीत दिलं. गाणी लिहिली. मराठी संगीताचेही कार्यक्रम केले. गाण्यांचे आल्बमही काढले. त्यांना अमाप लोकप्रियताही मिळाली आहे. नुकताच माझा मराठी गाण्यांचा ‘रंग नवा’ हा आल्बम रिलीज झालाय. तोही रसिकांना आवडतोय. लहान मुलांसाठीच ऑडिओ प्रोजेक्ट केलंय. जर्मनीच्या एका मल्टिव्हिजन प्रोजेक्टमध्ये मी बॅकग्राऊण्ड म्युझिकही दिलं आहे. लॉस एंजेलिसमध्ये झालेल्या बहिणाबाई चौधरींवरील ‘माझी माय सरस्वती’ या सांगितिक नाटकाला पाश्चिमात्य संगीतही दिलंय.

तुमच्या संगीतावर पाश्चिमात्य प्रभाव आहे, असं म्हटलं जातं…

हा समज चुकीचा आहे. ज्यांना असं वाटतं त्यांनी ‘कृष्ण माझा’ हा आल्बम ऐकावा. यात भावगीत आहे, भक्तिगीत आहे. सुरेश वाडकरांनी यातील गाणी गायलीत. ‘टाइम्स म्युझिक’तफेर् माझा ‘हे नारायण नमोस्तुते’ हा हिंदी भजनांचा आल्बमही येतोय. माझ्या ‘रंग नवा’ या आल्बममध्येही याचा प्रत्यय येईल. मी पाश्चिमात्य संगीत शिकलोय आणि भारतीय संगीताबाबत बोलायचं झालं, तर माझी आई शैला जोशी उत्तम गायिका होती. तिच्याकडूनच संगीताचं बाळकडू मी घेतलंय. संगीतकार यशवंत देव यांचं मार्गदर्शनाखाली ‘शब्दप्रधान गायकी’चा मी अभ्यास केलाय.

संगीत रिअॅलिटी शोच्या भरघोस वाढत चाललेल्या पिकाबद्दल काय वाटतं? इथल्या विनर्सना व्यावसायिकस्तरावर खरंच संधी मिळते?

अभिजित सावंत चित्रपटात का येतोय? त्याने रिअॅलिटी शोमधून कमावलेल्या इमेजमुळेच नाही का? होतकरू गायकांना अशी इमेज बनवून देण्यात रिअॅलिटी शोजचा प्लॅटफॉर्म अत्यंत महत्त्वाचा आहे. अशा कार्यक्रमांमुळे त्यांना ओळख मिळते, लाइव्ह शोेजच्या ऑफर मिळतात. त्यातून पैसे मिळतात. संगीतकारांचंही अशा शोजवर लक्ष असतं. मीही अशा नवीन टॅलण्टकडे लक्ष ठेवून असतो. अशा रिअॅलिटी शोजचे काही तोटेही आहेत. या शोजमध्ये एसएमएसवरून ठरणाऱ्या विनर्सबाबत वादही आहेच. शिवाय अशा रिअॅलिटी शोजमुळे आपण दोन महिन्यांत गायक बनू शकतो, असा गैरसमजही काहींना होऊ शकतो. अशा गैरसमजांतून हजारो जण इथे येतात. अशा कार्यक्रमांमध्ये जुनीच पॉप्युलर गाणी गायली जातात. त्यामुळे नवीन गाण्यांच्या रिअॅलिटी शोची खरं तर मी वाट पाहतोय.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <strike> <strong>