You are here: Home » News » काव्यसरींत रसिक चिंब

काव्यसरींत रसिक चिंब

Untitled-2कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या ‘माझी माय सरस्वती’ने मैफलीस सुरुवात झाली. कविता म्हणजे नेमके काय इथपासून ते ती कशी जन्माला येते आणि तिचा मतितार्थ काय असतो, याचे ओघवते विवेचन मुक्ता बर्वे आणि मिलिंद जोशी यांनी निवेदनातून केले. कवितेचा हा प्रवास शब्द आणि सुरांच्या माध्यमातून रात्री उशिरापर्यंत सुरू राहिला आणि रसिकांच्या टाळ्यांच्या कडकडाटही.

बेधुंद कोसळणारा पाऊस, हवेत गारवा आणि चौफेर दरवळणारा मातीचा सुगंध…अशा वातावरणात सोमवारी ठाण्यात कवितांचा माहोल अधिकच बहरला. निमित्त होते ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या ५३व्या वर्धापनदिनानिमित्त ‘रंग नवा’ या विविधरंगी कवितांच्या दृक-श्राव्य अनुभव या बहारदार कार्यक्रमाचे. कवितांचा निखळ आस्वाद घेण्यासाठी केवळ ठाणेच नाही तर मुंबर्ई, कल्याण डोंबिवली आणि नवी मुंबर्ईतील असंख्य ‘मटा’ वाचकांच्या भरभरून गर्दीत ही काव्यमय रजनी साजरी झाली.

गडकरी रंगायतनमध्ये कार्यक्रमाच्या निमित्ताने मटा वाचकांचे स्वागत करणारी सुरेख रांगोळी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. संध्याकाळपासूनच ठाण्यात पावसाच्या सरी कोसळत असल्या तरी अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि प्रसिद्ध संगीतकार व गायक मिलिंद जोशी यांच्या साथीने कवितांचा हा रम्य प्रवास अनुभवण्यासाठी रसिकांची पावलं गडकरी रंगायतनच्या दिशेने वळत होती.

गडकरी रंगायतन येथे अशा प्रकारचा कार्यक्रम पहिल्यांदाच होत असल्याची प्रतिक्रिया वाशी येथील उमेश कुलकर्णी यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमासाठी खास वाशीहून आल्याचे त्यांनी सांगितले. तर नाट्यगृहात काव्यवाचनाचा कार्यक्रम होत असल्याचे वाचून उत्सुकता दुणावली, अशा शब्दांत विशाखा अभ्यंकर यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. हल्लीचे तरुण कविता वाचत नाहीत, असा त्यांच्याबद्दलचा समज आहे. पण काव्यवाचनाचा कार्यक्रम होत असल्याचे ऐकल्यावर ते मनाला खूपच भावले आणि त्यामुळे या कार्यक्रमाला आल्याची प्रतिक्रिया संजना रानडे या तरुणीने व्यक्त केली. पाऊस आणि कविता हे कॉम्बिनेशन खूप छान वाटले. त्यातच या कार्यक्रमामुळे लाडकी अभिनेत्री मुक्ता बर्वे हिला भेटण्याची संधी मिळणार असल्याने मी आवर्जून आले, असे विशाखा कुलकर्णीने सांगितले. डोंबिवलीहून आलेल्या ऋषिकेश इप्ते या युवकाने ‘मटा’तील ‘फास्ट न्यूज’ या सदराचे कौतुक केले. वेळ कमी असताना, केवळ हे सदर वाचल्यावरही ताज्या घडामोडी अगदी थोडक्यात समजतात, असे तो म्हणाला. तर भांडुप येथून आलेल्या अनिकेत गणपत्ये याने क्रीडा वृत्तांकन अधिक वाढवावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <strike> <strong>