You are here: Home » Poetry » मी दरवळेन की सुकून जाईन नुसता

मी दरवळेन की सुकून जाईन नुसता

मी दरवळेन की सुकून जाईन नुसता
फुलण्याच्या आधी विचार केला नव्हता

मी फूल जन्मत: आलो फुलण्यासाठी
कोमेजुन जाईन पुन्हा फुलाया करता

जगण्याच्या आधी अन नंतरही जगणे
मरणांची दारे येण्या जाण्या करता

हा लपाछपीचा खेळ कुणी खेळावा
काचेच्या भिंती जिथे लपाया करता

मी सरळपणाची अशी गाठली सीमा
की वळण निवडले सरळ चालण्या करता

मी रोज ऐकतो या श्वासांचे दोहे
पण कबीर कळला आज श्वास अडखळता

त्या अंधाराला पूर्ण मान्यता द्यावी
मग मनी उगवतो सूर्य खरा लखलखता

आनंदासाठी धीर धरूया थोडा
हसणे ही जमते थोडे जमता जमता

ही वाट गजलची खूप खाच खळग्यांची
काव्याचा सुटतो हात नियम सावरता

– मिलिंद जोशी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <strike> <strong>