You are here: Home » News » कवितांचा ‘रंग नवा’

कवितांचा ‘रंग नवा’

Untitled-1कविता म्हणजे कवीच्या मनाचा अव्यक्त हुंकार, कवीचा श्वास, कवीचा ध्यास… कविता ज्याला जशी भावते, तशी व्यक्त होते… कवितेचा रम्य प्रवास नियमाच्या चाकोरीत न बसणारा… अशाच कवितेच्या सुरेल प्रवासाची सफर ठाणेकरांना नुकतीच घडली. ‘अनामिका’ निर्मित आणि साई साक्षी प्रकाशित ‘रंग नवा’ या विविधरंगी कवितांवर आधारित दृकश्राव्य कार्यक्रमाचा शुभारंभ गडकरी रंगायतन येथे झाला.

कवयित्री बहिणाबाई चौधरींच्या ‘माझी माय सरस्वती’ने मैफलीस सुरवात झाली. कविता म्हणजे नेमकं काय, अर्था-भावार्थासह ती कशी जन्माला येतेआणि ती रसिकांपर्यंत पोहचल्यावर तिचा मथितार्थ काय असतो, असे कवितेचे विवेचन प्रसिध्द अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि संगीतकार व गायक मिलिंद जोशी यांनी निवेदनातून केले. कवितेचा हा अनवट प्रवास शब्द आणि सुरांच्या माध्यमातून उलगडत गेला.

‘कानोसा घेत केळ अंगात कापते, सीताफळाच्या कानात काही हळूच सांगते’ या ना. धो. महानोर यांच्या, तर ‘वासाचा पयला पाऊस आयला’ या अशोक बागवेंच्या ओळी रोमांचित करून गेल्या. किशोर कदम यांची ‘मुक्त पाऊस बरसावा असे वाटते’, अशी हळूवार कवितेची झुळूक या सफरीत अनुभवायला मिळाली.

‘पावसाच्या धुंद लहरी, चिंब करिती सांज प्रहरी,’ ‘सप्तकाचा कोणता स्वर साद घालतो कळेना’ या कवितेच्या बरसातीने रसिक चिंब झाले. याच सफरीत कुसुमाग्रजांच्या ‘नट’, ‘स्वधर्म’ सारख्या कविताही ऐकायला मिळाल्या. ‘सख्या तुला भेटण्यास भल्या पहाटे मी निघून आले’ ही सुरेश भट यांची गझल श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून गेली. मनिषा आणि मिलिंद जोशी यांनी ही मैफल सुरेल केली. या मैफलीला ज्ञानेश देव, आशिष आरोसकर, अमित गोठविडेकर, निषाद करलगीकर, संजय महाडिक यांनी स्वरसाज चढविला. कार्यक्रमाची निर्मिती दिनेश पेडणेकर आणि मुक्ता बर्वे यांची होती.

मुक्ताच्या आणखी कविता हव्या स्वतः मुक्ता बर्वे यांच्या आणखी कविता सादर व्हायला होत्या. कविता सुरेल झाल्या, पण काही कविता स्वरसाजाशिवाय नुसत्या शब्दप्रधानतेने ऐकण्यात आनंद असतो, तशाही काही कविता सादर व्हायला हरकत नव्हती. – स्मिता जोशी

वेगळा कार्यक्रम साचेबध्द कार्यक्रमापेक्षा हा कार्यक्रम वेगळा वाटला. कार्यक्रमाचा टेम्पो राखण्यासाठी उडत्या चालीच्या, रिदमिक कविता मध्यांतरनंतरही हव्या होत्या. मुक्ता बर्वे यांची डायलॉग डीलिव्हरी छानच.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <strike> <strong>